शरद🧔🏻
शरद🧔🏻

@psychosrd

28 تغريدة 5 قراءة Aug 13, 2023
ही गोष्ट तेव्हाची, जेव्हा केबल टीव्हीचं जाळं इतकं पसरलं नव्हतं, आणि गल्लीत ब-यापैकी कुटुंबांना ते आर्थिक दृष्ट्या पेलणारं ही नव्हतं‌. तेव्हाचा रविवार, आणि त्या रविवारची ओढ ही काही वेगळीच असायची. तेव्हा चॅनल बदलायची वगैरे भानगडच नसायची. एकदा का टीव्ही सुरू केला, +
की जे सुरू असेल ते पहायचं. मग आपण आपल्या आवडत्या कार्यक्रमाची वेळ साधून टीव्ही सुरू केला तरच आपलं काम झालं, नाहीतर इतर वेळी फक्त उभ्या काळ्यापांढ-या पट्टया वा गिजबिट मुंग्या आलेल्या दिसायच्या. तेव्हा ठराविक वेळेपर्यंत दूरदर्शन, म्हणजे आत्ताचे DD National सुरू असायचे, +
आणि साधारण दुपारनंतर DD सह्याद्री सुरू व्हायचे, आणि पुन्हा रात्री नऊ साडेनऊच्या आसपास DD National.! तेव्हा एखाद्या सणावाराला अथवा एखाद्या राष्ट्रीय सणाला विशेष असा कार्यक्रम किंवा विषेश चित्रपट हमखास ठरलेला असायचा. त्यातल्या त्यात +
१५ ऑगस्ट, २६ जानेवारीला हमखास दाखविल्या जाणाऱ्या क्रांतीवीर, प्रहार, क्रांती, तिरंगा या चित्रपटांचं नेहमीच अप्रूप वाटायचं, आणि कंटाळा तर अजिबात यायचा नाही.
तेव्हा प्रत्येक दिवसाची सुरुवात जशी व्हायची, तशीच रविवारची ही व्हायची. सकाळी सर्वात आधी आई जागी झालेली असायची. तिनं +
नेहमीप्रमाणे रेडिओ लावलेला असायचा. तेव्हा बहुतेक साधारण सहाच्या आसपास रेडिओचं प्रक्षेपण ही सुरू व्हायचं. आईनं त्याच्या ५-१० मिनिटे आधीच रेडिओ लावलेला असायचा, त्यामुळे सुरूवातीला काही मिनिटे फक्त बीपsss असा एकसारखा आवाज यायचा. हे +
आकाशवाणीचे सांगली/कोल्हापूर केंद्र आहे आणि आम्ही आता सहक्षेपित करत आहोत भक्तीगीतांचा कार्यक्रम... या आवाजानंतर कानावर पडणा-या वासुदेव आला.. हो वासुदेव आला, उठी श्रीरामा पहाट झाली, घनश्याम सुंदरा, धागा धागा अखंड विनुया, या गाण्यांनी पहाट अक्षरक्ष मंत्रमुग्ध होऊन जायची. अशावेळी +
आजूबाजूच्या परिसरात अंगणात फिरणारा खराटा ही हळूवार आवाजात कोरस द्यायचा. एव्हाना आईची आंघोळ, अंगण झाडलोट, सडा शिंपण, रांगोळी, उंबरा पुजा वगैरे झालेली असायची. आईनंतर पप्पाही कधीचे आवरून कपाळाला भस्माची तीन बोटं ओढून रेडिओ ऐकत निवांत चहा पीत बसलेले असायचे. आई +
आम्हा भावंडांना आंघोळीसाठी उठवायची तेव्हा साधारण सातेक वाजलेले असायचे. आई उठ वगैरे काही म्हणायची नाही, जवळ यायची, चादर ओढायची अन् निघून जायची. मी पुन्हा चादर ओढून घेऊन झोपी जायचो. आई पुन्हा यायची आणि चादर ओढून जायची. असं दोन तीन वेळा झाल्यावर +
शेवटी येऊन आई चादर ओढून, घडी करून भिंतीतल्या कपाटात ठेवून द्यायची. मग तेव्हा आळोखेपिळोखे देत, अंथरूण सोडण्याशिवाय पर्याय नसायचा. झोपेतून जागा झाल्यावर किलकिल्या डोळ्यांनी जेव्हा आजूबाजूला पहायचो, तेव्हा पाणी तापवायला अंगणात घातलेल्या चुलीचा धूर घरभर पसरलेला दिसायचा. तेव्हा +
घरटी शौचालयं नव्हती, आणि सरकारी शौचालयावर भयानक गर्दी आणि घाणीचं साम्राज्य. त्यामुळे घरापासून जवळच असलेल्या शासकीय धान्य गोदामाच्या बाजूला असलेल्या बाभळीच्या जंगलात टमरेल घेऊन जाऊन हलका होऊन यायचो. तेव्हा का कुणास ठाऊक पण दात घासण्याचा जाम वैताग यायचा, पण पप्पांना +
ही गोष्ट माहीत असल्यामुळे, मी दात घासे पर्यंत ते समोरच उभे रहायचे. महिन्याचा राशन भरताना कोलगेट पावडरचा एक मोठा डबा आणलेला असायचा. त्याला वरच्या बाजूला बारीक भोकं असायची. त्यातून हवी तेवढी पावडर हातावर घ्यायची अन् बोटावर लावून बोटं दातांवर रगडायची. गारगार +
मस्त वाटायचं. दात घासण्याचा कंटाळा असला तरी, ती कोलगेट पावडर गिळायला भारी वाटायचं. मग ही गोष्ट पप्पांच्या लक्षात आली की ते ओरडायचे, मग तेव्हा पटापटा दातांवर बोटं फिरवून मोकळा व्हायचो. आंघोळीला गेल्यावर जवळच असलेल्या आमच्या जनावरांच्या गोठ्यातील शेणमूताचा वास +
नाकात शिरायचा. मस्त गरमागरम वाफाळलेलं दोन तांबे पाणी अंगावर ओतून घेऊन मग दिवळीतल्या लक्स साबणाकडे हात जायचा. हो लक्सच.. तेव्हा लक्स साबण आणि पॉंन्डस पावडर शिवाय घराला घरपण नसायचं. मग हळूहळू त्या लक्स साबणाच्या फेसाळ वासात शेणमूताचा वास काही काळाकरीता नाहीसा होऊन जायचा. टिव्हीवर +
रंगोली कार्यक्रम सुरू असायचा. देखा हे पहली बार.. साजन की ऑंखोंमें प्यार वगैरे ऐकत ऐकत चहापाणी उरकायचं. इथं मुद्दामच ऐकत ऐकत हा शब्द वापरला आहे, कारण आमच्या घरी टीव्ही नव्हता. पलीकडून सख्या काकांच्या घरातून तो गाण्यांचा आवाज यायचा. चहापान आवरलं की +
आई नाश्त्याला काय करणार यांकडे आम्हा भावंडांचे लक्ष लागलेलं असणार. तेव्हा आत्ताच्या सारखी कांदेपोहे उपमा वगैरे ची पध्दत तशी फारच कमी, कुणी पाहुणेरावळे आले तरच, नाहीतर काल रातचा भात मस्त कांदा घालून गरम करून, कढईत परतून सर्वांनी खायचा किंवा +
रातची शिल्लक भाजी, आमटी वगैरे भाकरीच्या पीठात कालवून खमंग धपाटा बनवला जायचा. आईचे पीठाने माखलेले हात पाहून आज धपाट्याचा नंबर लागलेला दिसत होता. मी जाम खुश होतो, कारण गरमागरम धपाटा म्हणजे माझा जीव की प्राण. आई परातीमधे धपाटा थापतानाच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं असायचं. थापटलेला +
धपाटा तव्यावर पडला की तो खरपूस भाजताना त्याचा सुटलेला सुवास घरभर दरवळून जायचा. तो धपाटा भाजत असताना अधेमध्ये आई त्याच्यावर बोटं उठवायची. तेव्हा सहज मनात विचार येऊन जायचा की, आईला चटका वगैरे कसं काय लागत नाही, हात भाजत कसा काय नाही. धपाटा तव्यातून भाकरीच्या बुट्टीत न जाता, +
थेट ताटामध्येच यायचा. घरी खायला काहीही केलं तरी सगळ्यात आधी पहिला हक्क आम्हा बच्चे कंपनीचाच.
गरमागरम धपाटा पोटात ढकलून मी थेट मित्रमंडळीचा चौक गाठायचो. बॅट बॉल घेऊन ब-यापैकी पोरं जमलेली असायची. सात आठ जण जमली की मग आम्ही नंबर पाडून खेळाला सुरुवात करायचो. +
नंबर पाडायची भारी गंमत वाटायची आणि कुणी तक्रार ही करायचं नाही. सर्वांनी लांब जाऊन थांबायचं, एकाने जमीनीवर जेवढे खेळाडू असतील तेवढे नंबर उलटसुलट क्रमाने लिहायचं आणि प्रत्येक नंबर समोर एक उभी रेष ओढून, नंबरवर बॅट ठेवून झाकायचं. त्यानंतर लांब उभ्या असलेल्या सर्वांनी येऊन +
त्यातली हवी ती रेषा बोट ठेवून पकडायची. त्यानंतर झाकलेल्या नंबरवरून बॅट काढल्यावर ज्याचा बोट ज्या नंबरला असेल, त्याप्रमाणे बॅटिंग मिळायची. रविवार सुट्टीचा दिवस, त्यामुळे प्रत्येकाने आऊट होईपर्यंत निवांत खेळायचं, पळू वाटलं तर पळून रना काढायचं किंवा एकाच जागेवर थांबून +
सेहवाग सारखं फक्त छक्कं, चौकं हाणायचं. जाम भारी मजा यायची. मनसोक्त खेळून, गल्लीभर हिंडून एक-दोन वाजता घरी परतायच्या आधी, गल्लीतल्या एकमेव सरकारी बोअरवर पाणी उपसत उपसत आळीपाळीने आम्ही सर्वजण हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचो. दुपारचं जेवण झाल्यावर अभ्यास करीत असताना नकळत डोळे +
घड्याळाकडे जायचे आणि अजून चार वाजले की नाही हे तपासून घ्यायचो. हीच ती एक वेळ असायची, ज्याची आम्ही बच्चेकंपनी संपूर्ण आठवडाभर वाट पाहत असायचो. याच वेळी आमचे लाडके हिरो आम्हाला भेटायचे. दर रविवारी चार वाजता DD सह्याद्रीवर मराठी चित्रपट लागायचा. +
#लक्ष्या - #अशोक सराफ अथवा #लक्ष्या - #अशोकसराफ - #महेशकोठारे यांचा चित्रपट असला की आमची चंगळ असायची. ही तीन माणसं तर अगदी घरची वाटायची, इतका आपलेपणा वाटायचा यांच्याबद्दल. तात्या विंचू, कवट्या महाकळ, कुबड्या खबीस, गिधाड ही मंडळी ही तितकीच जिव्हाळ्याची. पण का कुणास ठाऊक, +
तेव्हा रविवार म्हटलं की फक्त आणि फक्त #लक्ष्या डोळ्यांसमोर यायचा. त्याच्या सिनेमाशिवाय रविवार नेहमीच अधुरा वाटायचा. माहेरची साडी, हळद रुसली कुंकू हसलं असले चित्रपट असले की मूड ऑफ व्हायचा. कारण काकांच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जमलेली महिलामंडळी अधेमध्ये सतत इमोशनल होऊन +
रडत असायच्या. अशावेळी आम्ही मित्रमंडळी मग पुन्हा एकदा बॅट बॉल जवळ करायचो.
मग रात्री बरोब्बर साडे नऊला हिंदी चित्रपट लागायचा, कधी कॉमेडी असायचा, तर कधी भयानक. त्यातल्या त्यात त्याकाळी टीव्ही वर लागणा-या चित्रपटांमध्ये भयानक कॅटेगरीमध्ये फक्त एकच आजतागायत लक्षात आहे, +
आणि तो म्हणजे 100days. अशा तऱ्हेने हवाहवासा रविवार नेहमीच संपून जायचा आणि पुन्हा एकदा सोमवार शाळेतील मित्रांच्या भेटीने लवकरच उगवायचा. शाळेचा सोमवारचा पहिला एक तास नेहमीप्रमाणे रविवारी पाहिलेल्या चित्रपटांवर चर्चा करण्यात निघून जायचा. +
मधल्या सुट्टीपर्यंत सगळं काही जुनं झालेलं असायचं. संध्याकाळ होईपर्यंत आम्ही पुन्हा एकदा पुढच्या रविवारच्या प्रतिक्षेत असायचो.
आता ते दिवस नाहीत, ती मजाही नाही. कारण आता घरोघरी केबल/डिश चं जाळं पसरलं आहे आणि प्रत्येक हातात मोबाईल, त्यामुळे मनोरंजन anytime, anywhere.! पण +
रविवारच्या आठवणींच्या खिडकीतून मन अजूनही भूतकाळात डोकावून पाहत असतं., नेहमीच.!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ
#बालपण
#मनातलं
#फाटलेली_डायरी

جاري تحميل الاقتراحات...