शरद🧔🏻
शरद🧔🏻

@psychosrd

22 تغريدة 7 قراءة Mar 11, 2023
का कुणास ठाऊक, पण आज करमत नव्हतं. ब-यापैकी सगळेच मित्र आज कामात अथवा कामानिमित्त बाहेर गेलेले. सुट्टीचा दिवस आणि त्यातच मी उशीराने उठल्यामुळे अंगात आळस ही खूप होता. नाश्ता झाला, त्यानंतर दीड दोन तासांनी जेवणही झालं, तरीही कशात मन लागत नव्हतं. एव्हाना जेवणं आवरून +
नुकत्याच पाठ टेकलेल्या आई-बाबांचा डोळा लागणारच होता, तितक्यात मी आईला बोललो की, आलो थोड्याच वेळात आणि मी घराबाहेर पडलो. कुठं चाललोय, ते काहीच माहीत नव्हतं. तसाच चालत चौकात येऊन थांबलो, एकवार एक रिक्षा सतत समोरून जात होत्या, पण नेमकं काय करायचं, कुठं जायचं +
काहीच पक्कं नसल्यामुळे मी तसाच तिथंच थांबून होतो. आता जवळपास अर्धा पाऊण तास होऊन गेला होता. उन्हाच्या तडाख्याने डोक्यातून निघालेली घामाची धार, खाली ओघळत येऊन गालावरच्या दाढीत हरवून जात होती. तितक्यात का कुणास ठाऊक वाटलं की, गावातल्या घरी जाऊन यावं. तसा लगेचच +
मी एका रिक्षेला हात केला. काही मिनिटांतच रिक्षा लक्ष्मी मार्केट परिसरात पोचली. तिथून चालत मग मी गावातल्या घराकडे निघालो. तसं तिथं उतरल्या उतरल्या जुन्या आठवणी खुणावत होत्या, पण मनाला आवर घालून मी तिकडं दुर्लक्ष करीत होतो. कधीतरी अगदी सहज बोलून गेलेलं माझंच वाक्य त्यावेळी +
माझ्या मनात घुटमळत होतं., "आठवणीतल्या जागा टाळता येतात, आठवणी नाही." त्या सा-या गुंत्यातून कसाबसा मग मी गल्लीत पोचलो. गल्लीतील नेहमीची ओळखीची घर माझ्याकडे आपुलकीने आणि प्रेमाने पाहत होती. तसं कुणीच काहीच बोललं नाही, पण एक प्रेमळ कटाक्ष आणि चेह-यावरील आश्वासक हसू, त्यावेळी +
मला खूप आधार देऊन जात होतं. मी माझी नजर हलकेच माझ्या घराकडे वळवली. बरोब्बर अंगणातच शेजा-यांनी दोन्ही तीन सायकली लावलेल्या दिसल्या. त्यांची आता तशी मला काहीच अडचण ही नव्हती आणि काही तक्रार ही नव्हती. मग माझी नजर तिथंच अगदी भिंतीला खेटून उभ्या असलेल्या तुळशी कट्टयाकडे गेली. +
शेजा-यांनी जमेल तसं, अधेमध्ये पाणी घातल्याने अजूनही ती तग धरून उभी होती. का कुणास ठाऊक, पण ती तुळस ही आज माझ्याकडे आश्वासक नजरेने पाहते आहे, असं मला वाटलं. बहुतेक त्या तुळशीलाही वाटलं असावं की, आता तिची उपासमार संपणार. मी खिशात हात घातला, किल्ली बाहेर काढली. किल्ली कुलूपाला +
लावणारच, तेवढ्यात कुलूप हसल्याचा मला भास झाला. किल्ली लावताच चटकन् कुलूप उघडले, बहुतेक माझ्यापेक्षा जास्त घाई त्या कुलूपालाच झाली होती. घरात आत येताच आधी मी पट्कन दरवाजा लावून घेतला. मग आहे त्याच जागी काही मिनिटे थांबलो. क्षणभरात भरपूर काही आठवून गेलं, अंगावर शहारा आला, +
हुंदका दाटून आला, डोळे पाण्याने भरून गेले. थोड्या वेळाने दोन पावलं पुढं जाऊन, बाथरूम समोरच्या पायरीवर बसलो. नकळतपणे नजर कोपऱ्यात पडलेल्या खराटा, सुपली आणि कच-याच्या डब्याकडे गेली. अचानक मनात विचार येऊन गेला की, निर्जीव वस्तू ही, माणसांत राहून किती माणसाळलेल्या असतात ना. +
त्यांनाही त्यांच्या सवयीच्या हाताची, सवयीच्या माणसाची आठवण येत असेलच ना, पण त्यांनी आपलं दुःख सांगायचे तरी कुणाला.? तिथंच थोड्याशा अंतरावर मांजरांच्या खाण्याच्या दोन तीन प्लेटस पडल्या होत्या. तशी भरपूर पिलावळं होती, आईसकट बहुतेक सहा, पण शेवटी फक्त तीनच शिल्लक होती आणि +
एक आई अशी चार. आता ती सुद्धा तिथं नव्हतीच, एक पिल्लू काहीतरी विषारी पदार्थ खाऊन मेलं, एकाला बोक्याने मारलं बहुतेक आणि एक गाडीखाली आलं, असं मला ऐकायला मिळालं होतं. तिथं मी एकटा रहायला होतो ना, तेव्हा त्यांचे तसे खूप लाड करायचो. सकाळी माझ्या चहा आधी त्यांना दूध बिस्कीट असायचं, +
कधी कच्चं अंडं, कधी माझ्यासाठी आणलेल्या अंड्यांच आम्लेट, तर कधी खास त्या पिलांसाठी आणलेलं कोंबडीचं काळीज कोटा वगैरे. लय लहान पिल्लं होती ती. तिथंच खायची, तिथंच हागायची मुतायची, खूप घाण वास यायचा, पण ती घाण काढताना आणि त्यांना पोटभर खाऊ घालताना काहीच वाटायचं नाही, कारण +
त्या इवल्याशा पिलांंच्या निमित्ताने का होईना, घराचं घरपण आणि चैतन्य जिवंत होतं, नाहीतर एरवी ती पिल्लं आईसोबत काही क्षण जरी बाहेर गेली की घर खायला उठायचं. पण आता फक्त त्या प्लेटरूपी आठवणीच शिल्लक होत्या. व्हरांडा ओलांडून पुढच्या खोलीचं कुलूप काढलो. +
जुन्या मातीच्या भिंती, बाजूलाच सुरू असलेलं नवीन बांधकाम, त्यामुळे सतत असलेली ओल आणि ब-यापैकी लाकूड, यामुळे घरात बहुतेक ठिकाणी वाळवी लागलेली दिसत होती. एकात एक घालून ठेवलेल्या प्लास्टीकच्या सहा खुर्च्या अवघडल्यासारख्या वाटत होत्या. सहज कॅलेंडर कडे लक्ष गेले, +
तिथं जुलै २०२२ असा महिना दिसत होता. आपल्या जाळ्यात आज इतकं मोठं काय सापडलंय, या विचाराने घरातल्या कोळ्यांमधे गोंधळ उडाला होता. पावडरचा डबा, एक टिकलीची डबी, दोन चार केसांना लावायचं चाफं, आणि साडीला पदर खोचायची एक पिन अजूनही तशीच, त्या कपाटावर पडलेली दिसत होती, +
बहुतेक दोनेक वर्षांपासून, अगदी तिथंच, तसंच.! ओलं धरून ठेवलेल्या भितींच बाकी खूप नवलं वाटतं होतं, कारण त्यांनी निर्जीव असूनही ओलावा जपलेला होता. तिथून पुढे बेडरूममध्ये आलो, तसं दृष्ट लागण्या जोगे सारेsss हे गाणं कानात वाजू लागलं. कित्ती आणि काय काय आठवून गेलं. +
खूप खूप जोरजोरात ओरडावं आणि रडावसं वाटत होतं. अचानक कुणीतरी त्या तिजोरीच्या आरशातून डोकावते आहे असं वाटलं, पण तो हवाहवासा असा निव्वळ भास होता. अचानक बांगड्यांची किणकिण, पैंजणाची छुमछुम कानात वाजू लागली. तसं मन सैरभैर झालं. मी लहान मुलाप्रमाणे इकडे तिकडे पाहू लागलो, +
पण कुणीही नव्हतं. अचानक किचनमधून कसला तरी आवाज ऐकू आला, म्हणून मी तिकडे वळलो. पाहतो तर काय, भांड्यांची चर्चा रंगली होती. त्या सभेचे अध्यक्षस्थान कुकरला देण्यात आलं होतं बहुतेक. कुकर बोलू लागला, माझी शिट्टी या घरात वाजून आता जवळपास दोन वर्षे होऊन गेली. +
आता हळूहळू सगळं काही विसरायला लागलंय. माणसांत राहून माणसाळलेले आपण, पण आपल्याला एकटं टाकण्याआधी ही माणसं एकदाही आपला विचार करत नाहीत. बाकी भांड्यांनीही कुकरच्या या मताशी सहमती दर्शवली. बिचारे परात, उलतान, ताटं, वाट्या, यांच रडू तर काही केल्या थांबतच नव्हतं. +
पिंप, हंडा, कळश्या त्यांच सांत्वन करत होत्या, पण त्याचवेळी त्यांचेही डोळे पाणावलेलेच होते. त्या तव्याची इतकी उपासमार होऊनही, अजूनही त्याचा जीव कशात अडकला होता देव जाणे. चुकून माझा धक्का भिंतीवर टांगलेल्या भांड्यांच्या कपाटाला लागला, तशी त्यातील काही भांडी फरशीवर आपटली. +
त्या भांड्यांच्या आवाजात घराचं चैतन्य पुन्हा एकदा हरवलं आणि त्याची जागा स्मशाश शांततेने घेतली. पुन्हा एकदा माझ्या मनात दृष्ट लागण्या जोगे सारेsss या गाण्याच्या ओळी वाजू लागल्या. डोळे पाण्याने भरून गेले.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ
#त्याच्या_मनातलं

جاري تحميل الاقتراحات...