दिवस मावळायला आला होता. कोपऱ्यात ठेवलेलं प्रेत अजूनही आपल्या लेकींच्या ओढीने ताटकळत पडून होतं. आता त्या देहातून जीव नावाचं पाखरू उडून गेलं असलं तरी, ज्या पाखरांचा जीव त्या देहात अडकलेला होता, ती पाखरं, त्याला एकदा शेवटचं पाहण्यासाठी त्याच्याकडे येत होती. आज अगदी +
सकाळी सकाळीच सांगावा आला होता. स्वत: मुलगाच बोलला त्यांचा, पहाटेच्या सुमारास नाना गेले, इतकंच बोलून त्याने लगेचच फोन कट केला. क्षणभर काहीच सुचत नव्हतं. नानांनी अंथरूण पकडून निव्वळ १५ च दिवस तर झाले होते, पण इतक्या लवकर हे असं होईल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. +
तासाभरातच आम्ही तिथं पोहचलो. काही दिवसांपूर्वीच नवीन बांधलेल्या स्लॅबच्या घरापुढे शंभरेक माणसं दिसत होती. घराच्या बाजूलाच असलेल्या विहिरीपाशी कावळ्यांची नेहमीची कावळ्यांची काव काव आज खूपच भेसूर वाटत होती. अंगणात जमलेली पुरूष मंडळी बारीक आवाजात कुजबुजत होती. +
घरातून बायकांचा रडतानाचा आवाज एकसारखा कानावर येत होता. त्यांच ते विशिष्ट पध्दतीच्या रडण्यानं नकळतपणे हुंदका दाटून येत होता. काळजात चर्र होऊन जात होतं. महापालिकेत कामाला असलेला एक मुलगा आणि दोन मुली असा नानांचा गोतावळा. +
एका मुलीचा नवरा काही दिवसांपूर्वीच दारूच्या व्यसनामुळे जीव गेलेला. तिच्या पदरात एक सोन्यासारखी पोरगी, आणि सासरा नेहमीच अंथरूणाला खिळून. दुसऱ्या मुलगीचं तसं चांगलं होतं. तिचा नवरा मास्तर. सगळं सुरळीत चालू होतं, ते म्हणतात ना अज्ञानात सुख असतं. नानांच जेवणं तसं ठरलेलंच. +
त्यांना सगळं अगदी झणझणीत लागायचं आणि सगळ्या भाज्यांमध्ये चिमूटभर पीठ. पण गेल्या काही दिवसांपासून तोंडाच्या तक्रारी मुळे त्यांना व्यवस्थितपणे जेवता येत नव्हतं. त्यामुळे त्यांची तब्येत कमालीची खालावली होती. दररोज जेवण उरकलं की मग ते विहिरीवरच्या आंब्याच्या झाडाखाली बसून +
बिडी फुकायचे. गेल्या कित्येक वर्षांपासून चा हा त्यांचा दिनक्रम, पण म्हणतात ना, कुठलंही व्यसन माणसाला लगेचच मारत नाही. ते हळूहळू माणसाला पोखरत असतं. नानांचही तेच झालं. नकळत त्यांना कॅन्सर ने गाठलं होतं. हे फक्त त्यांच्या मुलालाच ठाऊक होतं. पण काही दिवसांपासून सुरू असलेल्या +
आपल्या दाढेच्या दुखण्याकडे, आपला मुलगा दुर्लक्ष का करतो आहे, हे त्यांना समजत नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलाचा अचानक शांत झालेला चेहरामोहरा नानांना कोड्यात टाकणारा होता. आणि एके दिवशी नाना आणि त्यांचा मुलगा डेंटिस्ट कडे गेल्यावर, घरी परतल्यावर शेवटी नाईलाजाने, +
नानांच्या मुलाने नानांना सत्य सांगितलेच. नानांच्या टाळूला छिद्र पडलं होतं. हो कॅन्सर मुळेच. आणि त्या दिवसापासून त्यांनी जवळपास जगण्याची आशाच सोडली. नानांच्या मुलाला वाटतं होतं की, ती चीरफाड करून, नाकातोंडात पाईपा घालून जगताना मला नानांना पहायचं नाहीये. असंच जितकं जगतील +
तितके जगू देत. तितक्यात नानांच्या मास्तर जावयाची चारचाकी अंगणात थांबली, तसा मी भानावर आलो. गाडीतून उतरल्या उतरल्या नानाssss असा लेकीने फोडलेल्या हंबरड्याने परिसर पुन्हा एकदा गलबलून गेला. नानांची नातवंडं आजीला काय झालं.? आजी का रडतेय.? म्हणून एकसारखं प्रश्न विचारत होती. +
नाना असा गप्प का झोपलाय.? त्याला उठवा ना, तो आजीला गप्प बसवेल, हे बोबडे बोल ऐकून जमलेल्या सगळ्यांची मनं हेलावून जात होती. बघता बघता गावकर लोकं लगेचच पुढं आली. थोड्याच वेळात नाना दिसेनासे झाले. नाना जसजसे पुढे जात होते, तसतसा बायकांचा रडण्याचा आवाज वाढतच होता. +
नानांसोबत पुढे जात असताना माझे लक्ष सहज मागे गेले, अंगणातील नानांची ती नेहमीची खुर्ची आज रिकामी दिसत होती, आणि विहिरीवरच्या झाडावर आता एकही कावळा मला दिसत नव्हता.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ
#आयुष्य_वगैरे
#अडगळ
جاري تحميل الاقتراحات...