कधी कधी शाळेत असतानाही मन शाळेत नसायचं, कुठंतरी तिथंच, तिच्याच गल्लीत, तिच्या घराच्या खिडकीपाशी रेंगाळत असायचं. मग कधी एकदाची शाळा सुटते आणि दप्तर घरात टाकून तिच्या खिडकीशी जाऊन थांबतो, असं झालेलं असायचं. मग कधी कधी आई बाबा शेताकडे गेले असले की, +
शाळा सुटल्यावर मी मुद्दामहून वाट वाकडी करून तिच्या घराकडून यायचो. चौकातल्या रिक्षा स्टॉप पासून उजवीकडे वळून, तिथल्या गिड्डूच्या दुकानासमोरून, त्या एका छोट्याशा मशिदी जवळून, त्या अडगळीच्या रस्त्यातून जाताना ही, ती निदान ओझरती तरी दिसेल की नाही हीच धाकधूक लागलेली असायची. +
कधी कधी या विचारात इतका हरवून गेलेलो असायचो की, आजूबाजूला काय चाललंय, कोण हाक मारतयं, सोबत कोण आहे, यांचंही भान नसायचं. मग शेवटचं एक वळण घेतलं की, सगळं कसं स्वप्नवत वाटायचं. तिथल्या कोपऱ्यावरचं ते एक जांभळांच झाड, तिथंच भली मोठी उंच अशी नारळाची झाडं, +
शिवलिंग मामाच्या दारातलं ते पेरूचं झाडं, हे सगळं नजरेत सामावून घेत मी पुढे पुढे येत असायचो. तसं नेहमीचच हे सगळं, पण तिच्या घरच्या वाटेला येताना का कुणास ठाऊक या सगळ्या गोष्टींचं खूप नवल वाटायचं. मग तिच्या खिडकीपाशी आल्यावर तिला पहायची वा निदान तिचा आवाज तरी ऐकायची +
ओढ लागलेली असायची. तिथली ती दुकानवाली भाभी, तिचा नवरा, मुलं, आज थेट इकडं कसं काय? असं म्हणून हसून मला चिडवायची. पण माझं तिकडं तसं कमीच लक्ष असायचं. माझा तिथला मित्र, उम्या सोबत असला की मग मला काही भीती वाटायची नाही. कधी कधी तिच्या घरची सगळी मंडळी दिसायची, +
त्यांच हसणं बोलणं ऐकू यायचं, पण नेमकी तीच दिसायची नाही, वा तिचं बोलणं ही ऐकू यायचं नाही. तेव्हा मग मी हताश मनाने घराची वाट पकडायचो. घराकडे परतताना संध्याकाळची वेळ, गल्ली नेहमीप्रमाणेच गजबजलेली असायची, सगळी MIDC गॅंग नुकतीच कामावरून परतून, +
माव्याच्या पिचकाऱ्यांनी गल्लीचे कोपरे रंगवत असायची. कल्पीचा नवरा नेहमीप्रमाणे देशी पिऊन गल्लीच्या अगदी मध्यात लोळत पडलेला असायचा. त्या एका मोठ्या वाड्यात दररोजचं भावांच भांडणं लागलेलं असायचं, जाधवाच्या आऊ मावशी कुणीही काहीही ऐकत नसताना एकट्याच बडबडत बसलेल्या असायच्या. +
गल्लीच्या त्या तशा वातावरणातही एक वेगळीच नशा होती. रस्त्याच्या अगदी एका कडेने वाहणाऱ्या, त्या छोट्याशा गटारीचा उग्र दर्प एकसारखा नाकात जात असायचा. तिथल्या कोपऱ्यावरचा तो उकीरडा कायम उतू चाललेला असायचा, गुरवांच्या गोठयातील एकमेव जनावर उगाचच उड्या मारत असायचं. +
सरकारी नळावर पाण्यासाठी बायकांची कुस्ती लागलेली असायची, त्या बायका भांडत असताना तसं कुणीच मध्यस्थी करत नसायचं. पदर कमरेला खेचून, आवेशाने भांडणा-या त्या बाया पाहून नवल वाटायचं. कधी एकमेकांची पाण्याची भांडी लांब टाकली जायची, तर कधी एकमेकांना धक्का दिला जायचा. +
तिथला तो कालवा पाहताना कधी कधी वाटायचं की इथं सुद्धा कुणीतरी त्या क्रिकेट मॅच सारखा कॉंमेंटेटर पाहिजे होता, कसली भारी मजा आली असती ना. या सगळ्यात घराजवळ कधी आलो ते सुद्धा कळायचं नाही, पण मन कुठंतरी तिथंच, तिच्या त्या खिडकीपाशी रेंगाळत असायचं.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#त्याच्या_मनातलं
#आयुष्य_वगैरे
#त्याच्या_मनातलं
جاري تحميل الاقتراحات...