शरद🧔🏻
शरद🧔🏻

@psychosrd

18 تغريدة 5 قراءة Feb 04, 2023
तब्बल आठवडा आधीच मी तयारी सुरू केली होती. एक ग्रिटींग कार्ड घेतलं होतं आणि एक गुलाबाचे फुल, नेमकं त्या दिवशी घ्यायचं ठरवलं होतं. मनाची खूप तयारी केली होती. इतक्या वर्षांपासून आपलं असलेलं अबोल प्रेम, त्या दिवशी तिच्या समोर व्यक्त करायचं होतं. मनाला कुठंतरी वाटतं होतं की, +
बस्स.. खूप झाली आता नजरानजर. कधी, कुठे, कसं, हे #वेड आपल्याला लागलंय ते काही माहिती नाही, पण आता या वेडेपणाच्या निमित्ताने, त्या वेडेपणाला भेटायचं होतं, बोलायचं होतं. आणि मग एकदाचा तो दिवस उजाडला. फुल मार्केटमधून मी एक गुलाब घेतला. ग्रिटींग कार्ड घेताना खूप गोंधळलो होतो, कारण +
माझ्या मनातलं तिला नेमकं कळावं, असे शब्द कुठल्याच कार्डवर दिसत नव्हते. म्हणून मग एक साधचं कार्ड घेऊन, कधीतरी कुठंतरी वाचलेल्या दोन ओळी, साध्या बॉलपेनने मी त्यावर लिहल्या होत्या. तिच्या क्लासची वेळ हेरून, तिच्या नेहमीच्या वाटेवर डोळे लावून, मी तिची वाट पाहत होतो. कुठं थांबावं, +
कसं थांबावं काहीच कळतं नव्हतं. सतत जागा बदलत होतो. अगदी सकाळची वेळ, त्यामुळे बरीच ओळखीची मंडळी गाठ पडत होती, त्यांना कसंबसं टाळून, हातातलं कार्ड आणि गुलाब लपवत होतो. तेव्हा हातात घड्याळ घालायची ही लायकी नव्हती, म्हणून त्या सिनेमा हॉलच्या अगदी समोर असलेल्या घड्याळाच्या +
दुकानासमोर मी उभा राहिलो, त्यामुळे मला वेळेचं भान राहत होतं. पण तरीही काही केल्या मनाची चलबिचल कमी होत नव्हती. ती काय म्हणेल, तिला काय वाटेल, आपलं प्रेम ती स्वीकारेल काय, निदान मैत्री तरी करेल काय, तिच्या अथवा माझ्या घरी सांगेल काय, ती जर चुकून हो म्हणाली तर.. या आणि +
अशा अनेक विचारांनी मनात थैमान घातले होते. अजूनही मी सतत जागा बदलतच होतो, पण नेमके कित्ती वाजले, ते पहायला सतत घड्याळाच्या दुकानासमोर येत होतो. एव्हाना माझ्या चेहऱ्यावरील सगळा फ्रेशनेस निघून गेला होता. पाणी लावून मस्त चापून बसवलेले केस विस्कटले होते, तेलकट झालेला चेहरा मी +
सतत रूमालाने पुसत होतो, कारण तिच्यापुढे आपण निदान थोडं तरी decent वाटावं, दिसावं, मनात एवढा एकच विचार सुरू होता. ती खूप खूप खूप खूप खूप सुंदर.! ते गाणं नाही का.. अवसची रात मी अन् पुनवचा तू चांद गं.! आता खूप वेळ निघून गेला होता, पण अजूनही ती काही आलेली गेलेली दिसली नव्हती. +
मी सतत माझ्या हातातील कार्ड आणि गुलाब न्याहाळत होतो. अधेमध्ये दोन तीन वेळा तिच्या क्लासच्या वाटेवरील मशीदीच्या बोळात गेलोच. तेव्हा मनात सहज विचार येऊन गेला की, तिचं नाव लिहून इथंच कुठंतरी तिला दिसावं असं किंवा तिच्या सायकलवर ठेवावं आणि आडोश्याला थांबून ती कशी react होते +
ते पहावं. पुन्हा तो ही विषय टाळला. एकदा वाटलं की, त्या मशीदीच्या भिंतीला लागून असलेल्या कागदी फुलाच्या वेलावर ठेवून द्यावं, पण तिथं येणाजाणा-यांच्या नजरेला ते दिसत होतं, म्हणून मग हा पर्यायही टाळून, मी पुन्हा त्या घड्याळाच्या दुकानासमोर येऊन थांबलो. आता मला घरातून बाहेर पडून +
जवळपास पाच तास आणि तिथं घुटमळत थांबून जवळपास अडीच तास होऊन गेले होते. पण अजूनही ती काही दिसत नव्हती. आज एखादा जादा तास असेल, अशी माझ्या मनाची समजूत घालून, मी अजूनही तिथंच उभा होतो. हळूहळ थोड्याशा मुली मला येताना दिसल्या, तसा मी खुललो. किती वर्षे वाट पाहिलेला +
क्षण आज आपण जगणार, म्हणून मी खूप खुश होतो. पुन्हा दोन तीन वेळा केसांवरून हात फिरवलो, तेलकट झालेला चेहरा पुन्हा पुन्हा रूमालाने पुसू लागलो. हळूहळू सगळीकडे शांतता पसरली. सगळा क्लास रिकामा होऊन, पुन्हा पुढच्या वर्गाची मुलं आतमध्ये गेली. क्षणभर मला काहीच कळेना. आपण तर +
कुठेच गेलो नाही, आपण तर सकाळपासून इथेच घुटमळतो आहे. मग ती गेली कुठे. की आज क्लासला आलीच नाही. काहीच कळत नव्हतं.‌ अचानक खूप अस्वस्थ व्हायला लागलं. निराश मनाने मी पुन्हा त्या सिनेमा हॉलच्या समोरील घड्याळाच्या दुकानासमोर येऊन थांबलो. किती वाजलेत ते पाहिलं. आपण +
कित्ती उशीर वाट पाहतोय, त्याच माझं मलाच नवल वाटलं आणि मग नकळत हसूही आलं की गेली कित्येक वर्षे आपण हेच तर करतोय. कधी या चौकात, तर कधी त्या चौकात, कधी गल्लीत तर कधी शाळेजवळ, क्लासजवळ. आपण फक्त तिची वाट पाहत आलोय, तिला फक्त एकदा पाहण्यासाठी.! थोड्या वेळाने सिनेमा हॉलच्या +
कट्ट्यावर जाऊन बसलो. क्षणातच आजच्या काही तासांचा काळ डोळ्यांसमोरून गेला. आणि मग मी परतीची वाट धरली. घर जवळ करत असतानाही सतत वाटत होतं की, आज ती क्लासला का आली नसावी.? कार्ड आणि गुलाब कुणी पाहू नये म्हणून, शर्टाचं एक बटण खोलून आत लपवून ठेवलो होतो, पण नकळत एक काटा +
अगदी अलगद टोचतच होता. घरी आल्यावर हळूच ग्रिटींग कार्ड आणि गुलाब माझ्या कपाटात ठेवलो. पुन्हा फ्रेश होऊन, तोंडावर पावडर थापून तिच्या घराशेजारी जाऊन थांबलो. माझी नजर एकसारखी तिच्या घराच्या खिडकीवर आणि चौकटीवर खिळलेली होती.पण अजूनही काही केल्या ती दिसत नव्हती. आणि तितक्यात +
गल्लीच्या दुसऱ्या टोकावरून, ती तिच्या मैत्रिणी सोबत येत असलेली मला दिसली. माझ्या वेळेचं गणित नेमकं कुठं काय आणि कसं चुकलं, ते माझं मलाच कळत नव्हतं. नेहमी प्रमाणे अगदी निर्विकारपणे ती निघून गेली, मी चोरट्या नजरेने तिच्याकडे पाहतच होतो. आज दुसऱ्या वाटेने आलो, हे खूप बरं झालं, असे +
पुसटशे शब्द माझ्या कानावर आले. आणि मग तेव्हा नकळत वाटलं की, श-या... मोठ्ठा गेम झाला यार.! आणि मग नंतरही बरीच वर्षे असंच फक्त तिला पाहण्यातच निघून गेली. आणि तिला देण्यासाठी जपून ठेवलेला गुलाब आणि काही किरकोळ चारोळ्या वगैरे लिहलेली वही, मग एके दिवशी एका ओढ्याच्या पात्रात सोडून +
मोकळा झालो. पण काही वर्षांपूर्वी, त्या दिवशी, शर्टाच्या आत लपवून ठेवलेल्या, त्या गुलाबाचा काटा, अजूनही अधेमध्ये टोचत असतोच.!🎭
#आयुष्य_वगैरे
#त्याच्या_मनातलं
#एकतर्फी
#व्हॅलेंटाईन_डे_वगैरे

جاري تحميل الاقتراحات...