12 تغريدة 8 قراءة Sep 18, 2024
🔴 ऑपरेशन पोलो - गोष्ट मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या शेवटच्या ४ दिवसांची !!
स्वातंत्र्यानंतर हैदराबाद आणि एकदोन संस्थाने सोडली तर इतर संस्थाने भारतात विलीनीकरणाच्या करारानुसार सहभागी झाली होती.
हैदराबाद मात्र समजुतीने भारतात सामील होणे तर दूरच..उलट त्याच्या हालचाली वेगळा देश कसा निर्माण होईल त्यानं दिशेने होत होत्या.
भारताला स्वातंत्र्या मिळण्याआधीच निजामाने दोन फर्माने काढून १५ ऑगस्ट १९४७ पासून हैदराबाद हा स्वतंत्र देश असेल हे जाहीर केले होते.
पण निजामाला भारतापासून धोका वाटतं होता. आणि म्हणूनच निजामाला आपले लष्करी बळ वाढवणे गरजेचे वाटू लागले.
१/n + 👇
#म #Live_Thread
आता हे लक्षात घ्या की हैद्राबाद संस्थान हे तेव्हा देशातील सर्वात मोठे संस्थान होते. ज्या ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले होते त्यांच्या ग्रेट ब्रिटनपेक्षा जास्त क्षेत्रफळ (~२ लाख चौ किमी) आणि जवळपास तेवढीच लोकसंख्या (~ २ कोटी) असणारे विशाल संस्थान होते.
आणि निजाम त्याकाळी भारतातच नाही तर जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती होता.पण इतका श्रीमंत असूनही तो तितकाच कंजुषही होता असे म्हणतात.जगातील सर्वात मोठा हिरा ' जेकब ' तो पेपरवेट सारखा वापरणारा माणूस महालात मात्र जुना पायजमा आणि अंगरखा वापरत असे..😬(१९३७ ' टाईम ' मासिकानुसार )
असो..!
२/n+
थोडक्यात काय तर, त्याच्याकडे शस्त्र खरेदी आणि लष्कर इ साठी निजामाकडे अमाप पैसा होता.
पण.पण.पण..
भारताचा ब्रिटिशांसोबत जो
' As it is ' / ' जसा आहे तसा ' भारत सोडून जायच्या कराराप्रमाणे सर्व संस्थानांना भारत सरकारमार्फतच शस्त्र खरेदी करणे बंधनकारक होते.
आणि याच कराराचा भंग करण्यासोबत ३ मुख्य चुका दीड शहाण्या निजामाने केल्या.
१) निजामाने झेकोस्लोव्हाकिया, पोर्तुगीज सरकारकडून शस्त्र खरेदी केली ती केली आणि चोरट्या मार्गाने ही शस्त्रे करार तोडून संस्थानातही आणली.त्यात ब्रिटिशांनी आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने संस्थानांनी किती सैन्य ठेवावे याबद्दल काही निर्बंध घातले होते. त्याचाही भंग करून निजामाने सैन्याच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली.
२) 'इत्तेहादुल मुसलमीन' या रझाकारांच्या संघटनेचा प्रमुख कासिम रझवी 👇 याने रझाकारांची संख्या (शेवटीशेवटी ~ २० हजार ) व बळ वाढवून गावोगावी अत्याचार करण्यास सुरुवात केली. राजकीय विरोधकांबरोबरच गोरगरिबांच्या हत्या होऊ लागल्या.संस्थानातील गैरमुस्लिम जनतेत दहशत निर्माण केली जाऊ लागली. रस्त्यारस्त्यात हत्या,स्त्रियांवर अत्याचार होऊ लागले.घरे लुटली जाऊ लागली.ह्याचा सगळ्यात मोठा फटका अंबाजोगाई आणि आसपासच्या भागाला बसला.
३/n+
३) सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका (निळा बाण 👇) सर्व बाजूंनी निजामी मुलखाने वेढलेला होता.सोलापूर-बार्शी मार्गावर लष्करी तुकडी गस्त घालीत असताना नान्नज या गावाजवळ भारतीय लष्करी तुकडीवर निजाम पोलिस आणि रझाकारांनी हल्ला केला. अशेच हल्ले याच भागातील खारे टाकळी, कांबी या गावांजवळ भारतीय लष्करावर करण्यात आले.
कराराचा भंग , सामान्य जनतेला त्रास आणि थेट लष्करावर हल्ला ही तिन्ही कारणे लष्करी बळ वापरासाठी पुरेशी होती.
त्यातही कराराचा भंग हे कारण सर्वात महत्वाचे होते..तसे नसते झाले आणि निजाम जर वेळेत संयुक्त राष्ट्र संघात गेला असता तर कदाचित भारताच्या मध्यभागी एक वेगळा देश किमान काही वर्ष तरी दिसला असता.
असो..पुढे 👇
४/n+
हैदराबादचा प्रश्न सामोपचाराच्या मार्गाने निजाम मिटवण्यास तयार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर लष्करी बळाचा वापर करणे अपरिहार्य झाले होते.
नेहरूसारखे नेते भारतातल्या भारतात लष्करी कारवाई टाळण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते.
पण त्यातच हैदराबादचे पंतप्रधान मीर लायक अली यांनी भारत सरकारला पत्र पाठवून हैदराबादचा प्रश्न शांततेने (😏) सुटावा म्हणून हैदराबाद हा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघात नेत असल्याचे कळवले.
संयुक्त राष्ट्र संघाकडे हैदराबादचा प्रश्न नेऊन त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याच्या निजामाच्या प्रयत्नांमुळे शेवटी पोलिस कारवाई करण्याचा निर्णय दिल्लीत ९ सप्टेंबर १९४८ रोजी घेण्यात आला.(देशांतर्गत कारवाई म्हणून पोलीस कारवाई !)
५/n+
दि. १३ सप्टेंबर १९४८ रोजी कारवाईस प्रारंभ केला. या कारवाईचे सांकेतिक नाव होते 'ऑपरेशन पोलो!'
१३ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय सैन्य संस्थानामध्ये पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून घुसले. या कारवाईचे नेतृत्व ले. ज. राजेन्द्रसिंह यांच्याकडे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली
१) मेजर जनरल जयंतीनाथ चौधरी
२) मे.ज.डी.एस.ब्रार
३) मे.ज.ए.ए. रूद्र,
४) ब्रिगेडियर शिवदत्त सिंग
(Btw पोलो खेळाच्या संघात ४ खेळाडू असतात..😉👇)
आणि हवेतून एअर व्हाईस मार्शल मुखर्जी यांनी 'ऑपरेशन पोलो' ही कारवाई पूर्णत्वास नेली.
६/n +
दिनांक १३ सप्टेंबर रोजी पाहिली मोठी चकमक झाली नळदुर्गला..!
नळदुर्गचा पूल हा सामारीक दृष्टीने महत्वाचा होता कारण हा पूल निकामी झाल्यास भारतीय सैन्याच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याची शक्यता होती.
म्हणून निजामी सैन्यातील ब्रिटिश अधिकारी लेफ्टनंट टी. टी. मूर एका जीपमध्ये स्फोटके घेऊन नळदुर्गकडे निघाला होता. पण त्यापूर्वीच भारतीय सैन्याने या पुलावर ताबा मिळवला होता.
येथे झालेल्या चकमकीत निजामाचे दोनशे सैनिक आणि दोन अधिकारी मारले गेले.आणि नळदुर्गच्या किल्यावरील उपळी बुरूजावर ( 👇 लपून बसलेल्या निजामी सैन्याच्या एका तुकडीलाही भारतीय सैन्याने जेरबंद केले. या पहिल्याच दिवशी भारतीय सैन्याने आदिलाबाद, जळकोट, तुरोरी, तुळजापूर व परभणी जिल्ह्यात माणिकगढ आणि कनेरगाव ही गावे काबीज केली.
(व्हिडिओ क्रेडिट ( ?? ) by dr_akshay_jadhav_ on Instagram )
७/n+
पुढे चाळीसगावाहून कूच केलेल्या भारतीय सैन्य तुकडीने १४ सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, दौलताबाद ही गावे ताब्यात घेतली.
१५ सप्टेंबर रोजी रात्री भारतीय सैन्याने औरंगाबाद शहर काबीज केले. आणि तेथील रेडिओ केंन्द्र ताब्यात घेतले. रेडिओवरून भारतीय राष्ट्रगीत वाजू लागले. त्यामुळे या केन्द्रावरून भारतीय सैन्याची पीछेहाट होत आहे असा जो खोटा प्रचार निजामाकडून सतत केला जात होता तो थांबला.
१५ सप्टेंबरला पहाटे उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूड येथे असलेल्या निजामी सैनिकांनी लातूररोडपर्यंत माघार घेतली.
पुढच्या दोनच दिवसात १७ सप्टेंबर रोजी भारतीय सैन्य हैदराबादजवळ सदाशिवपेठपर्यंत पोहचले.
भारतीय सेनाधिकाऱ्यांनी निजामचे सैन्यप्रमुख जनरल अल इडुस यांना शरणागती पत्करावी असा संदेश दिला. या संदेशाची अंमलबजावणी निजामाच्या सैन्य प्रमुखाकडून झाली नाही तर दुसऱ्या दिवशी हैदराबाद शहरावर अंतिम हल्ला करणार हे सांगण्यात आले.
८/n +
हे 'ऑपरेशन पोलो' ची कारवाई सुरू करताना या योजनेचे दक्षिण विभाग प्रमुख राजेन्द्र सिंहजी यांची विविध भाषांमधील मुद्रित निवेदने विमानामधून संस्थानाच्या विविध भागांमध्ये टाकण्यात आली होती.
या निवेदनात भारत सरकार आणि भारतातील जनतेच्या सदिच्छेने हैदराबादेत कायद्याचे राज्य प्रस्थापित करून सर्वांना सारखे संरक्षण देण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला होता. हा संदेश संस्थानातील सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचल्याने नागरी लोकमत लष्करी कारवाईला अनुकूल झाले होते.
निजाम सैन्याकडूनही म्हणावा तसा फारसा प्रतिकार होत नव्हता. म्हणूनच केवळ चार दिवसात भारतीय सैन्याने हैदराबादपर्यंत सहज मुसंडी मारली.
इकडे निजाम आंतरराष्ट्रीय सुरक्षा समिती (International Security Council) काही हस्तक्षेप करील काय याची वाट निजाम आतुरतेने पहात होता.निजामाने हैदराबाद संस्थानाबद्दल केलेल्या तक्रारीवर विचार करण्यासाठी पॅरिसमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक १६ तारखेस होणार होती. म्हणून निजामाला थोडीफार आशा वाटत होती. परंतु या बैठकीत निजामाची तक्रार दाखल करून घेण्यात आली. पण त्यांनी पुढील विचारविनिमय २० सप्टेंबर रोजी करण्याचे ठरवले..😬😭😜
९/n+
पण इकडे भारतीय सैन्य ४ दिवसात दाराशी येऊन ठेपल्याने निजामापुढे शरणागतीशिवाय दुसरा मार्ग उरला नाही.
शेवटी दीड शहाण्या निजामाने १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी आपली शरणागती जाहीर केली.
१८ सप्टेंबरला भारतीय सैन्याने एका साध्या समारंभात निजामी सैन्याची शरणागती स्वीकारली.
आणि १९ सप्टेंबर रोजी मेजर जनरल जयंतीनाथ चौधरी यांनी लष्करी प्रशासक म्हणून सूत्रे हाती घेतली..!
१०/n+
एच्.ई.एच.' 'रूस्तुमे दोरों' 'फतहजंग' 'जिल्ले सुबानी' असे काय अन् काय खिताब मिरवणाऱ्या सातवा निजाम नवाब मीर उस्मान अलीखान याला स्वतःच्या हाताने हैदराबाद संस्थानाचे विसर्जन करावे लागले.
त्याचे सार्वभौम मुस्लिम राष्ट्र निर्माण करून भारताच्या सार्वभौमत्वला धोका निर्माण करण्याचे स्वप्न धुळीला मिळाले.
त्याची धूर्तता, राजकीय डावपेच, पाताळयंत्रीपणा हे सारे गुण निष्षभ ठरले.
आणि अशा तऱ्हेने दोनशे चोवीस वर्षे गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडलेल्या संस्थानाच्या क्षितिजावर अखेर स्वातंत्र्याचा सूर्य आजच्याच दिवशी ७६ वर्षांपूर्वी उगवला..! 😍❤️😍
११/१२+
टीप
१) ह्या सर्वात सामन्यांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवायचे काम स्वामी रामानंद तीर्थ ह्या संन्याशाने केले हे विसरून चालणार नाही. मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणजे स्वामी रामानंद इतके घट्ट समीकरण आहे.
(नांदेडला त्यांच्या नावावर विद्यापीठ का आहे ते आता तुम्हालाही माहिती आहे..!)
२) महाराष्ट्राचा आजचा भूगोल नकाशा जसा दिसतो त्यात कम्युनिस्ट पार्टी चा मोठा हात आहे हे विसरून चालणार नाही.
मुंबई महाराष्ट्रात येण्यासाठी आचार्य अत्रे (कम्युनिस्ट पार्टी)आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामात पोलिस कारवाई सुरू होण्याआधी हैद्राबादला आतून तोडण्याचे कामही ह्याचं पक्षाने केले आहे.
म्हणून त्यांच्या राष्ट्रप्रेमावर किमान मराठी माणसाने शंका घेणे चुकीचे असेल.
३) वरील सर्व माहिती वेगवेगळे शासकीय स्त्रोत व आंतरजाल यावरून संकलित केलेली आहे तरी त्यात चुका असू शकतात ह्याची नोंद घ्यावी..🙏
१२/१२ +

جاري تحميل الاقتراحات...