Malhar Pandey (MODI KA PARIVAR)
Malhar Pandey (MODI KA PARIVAR)

@malhar_pandey

21 تغريدة 12 قراءة May 11, 2022
#Thread : नाना वाडा - मेणवली
इतिहासाची पाने धुंडाळली कि आपल्याला अनेक शूर वीरांची, ऐतिहासिक वास्तूंची माहिती होते, आपल्यासमोर इतिहास उभा राहतो. त्यात मराठा इतिहास असला कि त्या पानांना एक वेगळं वलय असतं. 1/21
अश्याच एका इतिहासपुरुषाच्या विराट निवासस्थानी जाण्याचा योग मला काही दिवसांपूर्वी आला. मी काही दिवसांपूर्वी, मराठा साम्राज्यातील अत्यंत महत्वाच्या पात्राच्या वाड्यावर अर्थात नाना फडणवीस यांचा वाडा पाहायला वाईला गेलो होतो. 2/21
निसर्गाच्या सानिध्यात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मेणवली नावाच्या ऐतिहासिक गावाच्या दक्षिणेस कृष्ण नदीच्या तीरावर अश्या रम्य ठिकाणी हा वाडा इतिहासाची साक्ष देत उभा आहे. खुल्या हाताने तो आलेल्या सगळ्या पर्यटकांना आलिंगन देतो आणि घेऊन जातो १८ व्या शतकातील इतिहासाकडे. 3/21
बालाजी जनार्दन भानू अर्थात नाना फडणवीस हे मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचे व्यक्ती होते हे वेगळे सांगणे गरजेचे नाही. वयाच्या १४ व्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर नाना फडणवीसांनी फडणविशी स्वीकारली आणि तिथून पुढे चालू झाला तो नाना फडणवीसांचा इतिहास. 4/21
१७६१ मध्ये पानिपतात मराठ्यांचा झालेला पराभव आणि त्याच सोबत अनेक मातब्बर योध्यांचा मृत्यू, या दोन्ही गोष्टी मराठा साम्राज्यासाठी धोकादायक होत्या. मराठ्यांचा दिल्लीवर असलेला दरारा कमी होऊ लागला होता. 5/21
पानिपतच्या युद्धानंतर, मुलाच्या, भावाच्या आणि इतर सहकाऱ्यांच्या मृत्यू पश्चात बाजीरावांचे पुत्र व तत्कालीन पेशवा नानासाहेब फार दिवस जगले नाहीत. त्यांच्या निधनानंतर नानासाहेबांचे पुत्र माधवराव यांच्यावर पेशवाईची जबाबदारी सोपवली गेली. 6/21
माधवरावांची कारकीर्द खडतर असणार आहे हे त्यांच्या पेशवाईच्या पहिल्या काही दिवसातच लक्षात आले होते. अश्या परिस्थितीमध्ये शासकाला गरज असते ती उत्तम सल्लागाराची. नाना फडणवीसांनी हीच भूमिका निभावली. 7/21
केवळ सल्लागारच नव्हे तर पेशवे मोहिमेला गेल्यावर संपूर्ण राज्य सांभाळणे असे कार्य नाना करत. माधवरानाच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या प्रसंगाचे साक्षीदार आणि साथीदार नाना होते. कालांतराने माधवरावांच्या अकस्मात निधनानंतर नानांनी पुढील पेशवा अर्थात नारायणरावांना देखील मदत केली. 8/21
नारायणरावांच्या हत्येनंतर राघोबादादांनी पेशवाईची वस्त्रे स्वतःकडे ओढवून घेतली परंतु नानांनी हुशारीने, त्यांची कारकीर्द संपवली व सवाई माधवराव यांना पेशवाईवर बसवले. नानांनी त्यांच्या आयुष्यात राज्यकारभारामध्ये अनेक सारे बदल घडवले. 9/21
नानांची ओळख अनेक इतिहासकारांनी मुत्सद्दी व मराठा साम्रज्याला तारून नेणारा अशी केली आहे. १७८० च्या दरम्यान नानाच्या वाड्याचे बांधकाम पूर्ण झाले. आता पर्यंत मी नानांचा अगदी ओघवता इतिहास तुम्हा सर्वांसमोर मांडला आहे, आता पाहूया वाडा नेमका कसा आहे. 10/21
मेणवली या निसर्ग रम्य गावात शिरल्यावर कृष्ण काठावर वसलेला वाडा अगदी लगेच दिसून येतो व तो पेशवेकालीन आहे हे कळून येतं. पुस्तकी विटा, सागवानी लाकडांच्या कमानी, चौक, तुळशी वृंदावन अश्या सगळ्या गोष्टी पाहिल्या कि आपण १८ व्या शतकात गेलो आहोत असच वाटतं. 11/21
वाड्याच्या सुरुवातीलाच आपण आत्ता म्हणतो तशी लॉबी आहे, एक मोठा दरवाजा आहे जो साधारण ३० ते ३५ फूट एवढा असेल. दरवाज्याच्या आत गेल्यावर आपल्याला दिसतो तो एक मोठा चौक. चौकाच्या एका बाजूला एक मोठी खोली आहे, कदाचित धान्यांची कोठारे असावीत. 12/21
सागवानी लाकडांवर केलेले वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आपल्याला त्या काळातील कारागिरीची आणि करवून घेणाऱ्यांच्या रसिकतेची किंवा अस्थेटिक सेन्स चे दर्शन घडवून देते. वरच्या मजल्यावर जाताना अत्यंत निमुळत्या पण भरभक्कम अश्या पायऱ्या लागतात. 13/21
या पायऱ्या दोन जाड भिंतीच्या मध्ये बांधल्या गेलेल्या आहेत. वरच्या माळ्यावर गेल्या गेल्या आपण आत्ताच्या भाषेतील लिविंग रूम मध्ये येतो व तिथूनच एक दोन छोट्या खोल्या सोडल्या कि नानांची खोली दिसते, ज्यात आजही, अत्यंत चांगल्या पद्धतीनं नानांचा पलंग जपून ठेवला आहे. 14/21
तिथून बाहेर पडल्यावर आपल्याला दिसतो तो वाड्यातील स्वयंपाक घराच्या बाजूला असलेला चौक. तो चौक ओलांडला कि आपण येतो नानांच्या चर्चेच्या अथवा कारभाराच्या ठिकाणी. इथे आजही नाना जिथे बसायचे ती जागा, ज्याच्यावर लिहायचे ती मेज जतन करून ठेवली आहे. 15/21
याच खोलीच्या खिडकीतून बाहेर पहिले कि दिसतो तो निसर्गरम्य मेणवली घाट आणि विष्णूचे मंदिर. पुढे गेलो कि एक मोठी खोली येते जिथे नानांच्या काळात काढलेली काही चित्र आहेत, ज्याचे जतन कार्य सध्या सुरु आहे. 16/21
कोणी महत्वाचे लोक आले व काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करायची असेल तर नानांच्या वाड्यात त्या वेळेला एका खलबत खान्याची सुद्धा सोया होती. खलबत खाण्याच्या खिडकीतून खाली पाहिल्यावर वाड्याचा मुख्य चौक दिसतो. कदाचित, कोण आले आहे हे पाहण्यासाठीच हि यंत्रणा असावी ! 17/21
खलबत खान्यातून खाली उतरले कि मुख्य चौक, ज्याला हळदी कुंकवाचा सोपा असेही म्हटले जाते लागतो जिथे एक पुष्करणी आहे. तिथेच काही जुनी पुराणी चित्र आहे व देवघर देखील आहे. वाड्याच्या भवती साधारण २० ते २५ फुटाची मोठी भिंत आहे, जिथे दोन बुरुज आहेत. 18/21
वाड्याचे रूप आखीव रेखीव आहे आणि एकूणच इतिहासावर, महाराष्ट्रावर निष्ठा असलेल्या सर्वानी हा वाडा पाहण्यासारखा व अनुभवण्यासारखा आहे. हे वाडे, मंदिरे, समाधीस्थळं, गडकिल्ले हे आपला इतिहास आहेत आणि पुढच्या पिढीला इतिहासाचे विविध पैलू दाखवणारी साधने आहेत. 19/21
हा इतिहास जतन करणं, त्याचा जागर करणं आणि समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे तुम्हा अम्हासारख्या सूज्ञांचे काम ! हेच खरे शिवकार्य !
नाना वाड्याच्या मागील मंदिरांची virtual सफर पुढच्या बुधवारी. नाना वाड्याच्या विषयी असलेला हा लेख कसा वाटला हे आवर्जून कळवा ! 20/21
अशीच एक #मल्हारवारी घेऊन पुढच्या बुधवारी पुन्हा ! तो पर्यंत, जय श्री राम ! 21/21

جاري تحميل الاقتراحات...